
वणी (प्रतिनिधी) : आयफोन १६ प्रो खरेदी करण्यासाठी विधीसंघर्षग्रस्त बालकाने घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. वणी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत ६ लाख ७२ हजार रुपये, जप्त केले आहेत.
कनकवाडी येथील बंडू विठोबा बोढाले यांच्या घरात २० ते २१ ऑगस्टदरम्यान घरफोडी झाली होती. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८६१/२०२६ दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान डी.बी. पथकाने संविधान चौकातून एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह गुणवंत उर्फ पोलार्ड पांडुरंग दानव (वय २३) याला ताब्यात घेतले. चौकशीत आयफोन १६ प्रो घेण्यासाठी पैशांची गरज असल्याने चोरी केल्याची माहिती समोर आली.
चोरीतील २५ ग्रॅमचा सोन्याचा हार, १५ ग्रॅमचा मोठा गोप, ५ ग्रॅमचा लहान गोप आणि ३ व ४ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, असा एकूण ५२ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील सुरज हुसैन गेडाम (वय २५) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई वणी पोलिसांच्या डी.बी. पथकाने केली.
