▪️तैलचित्र अनावरण व वृक्षारोपणातून सामाजिक एकता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

वणी (प्रतिनिधी) : समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार जनमानसात रुजविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना उजाळा देत राजूर कॉलरी येथे १८ ऑक्टोबर रोजी सामाजिक एकतेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक’ या नामफलकाचे अनावरण आणि वृक्षारोपण असे तीन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्य तथा ज्येष्ठ नेते अशोक वानखेडे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा राजूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य डेव्हिड पेरकावार, माजी जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत, ज्येष्ठ नेते मारोती पाटील, शिक्षक प्रकाश तालावार, चिखलगाव-राजूरचे युवा समाजसेवक फैजल खान आणि लढा संघटनेचे संस्थापक प्रवीण खानझोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कॉम्रेड ॲड. कुमार मोहरपुरी, माजी सरपंच विलास देवतळे, मो. अस्लम, जाफर खान, रियाजुल शेख, समया कोंकटवार, रवी कोमलवार, सुरज चाटे, वणीचे युवा नगरसेवक ऋतिक मामीडवार, ॲड. सिडाम, पास्टर रोशन, साजिद खान, जयंत कोयरे, राजू बोरगलवार, ऐतसामभाई, वकील कुरेशी, भाजप युवा नेते अनिल डवरे आणि पत्रकार विनोद आदे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानासह शोषितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या त्यांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील विषमता दूर करून बंधुता, सामाजिक सलोखा आणि मानवतेची मूल्ये दृढ करण्यासाठी अण्णाभाऊंचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रकाश तालावार यांनी केले. महेश लिपटे यांनी सूत्रसंचालन केले, तर आयोजक अजय कंडेवार यांनी आभार मानले. तैलचित्र व चौक नामफलकाच्या अनावरणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तर वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
न्यू वणी डायरी न्यूज पोर्टल

