
वणी (प्रतिनिधी) – मारेगाव तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणाविरोधात काँग्रेसने 28 जुलै रोजी मारेगाव ते भालेवाडी दरम्यान धडाकेबाज अर्धनग्न आंदोलन छेडले. या आंदोलनात काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय खाडे, नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराना यांच्यासह वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक, शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
मारेगाव ते मार्डी तसेच इतर प्रमुख रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांनी भरलेले मार्ग व त्यामुळे होणाऱ्या अपघातांविरोधात हे आंदोलन करण्यात आले. प्रशासन व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून संतप्त कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येऊन लेखी आश्वासन दिले की लवकरात लवकर संबंधित रस्त्यांचे काम हाती घेण्यात येईल. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
परंतु, दिलेल्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी झाली नाही, तर आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
