
वणी : शहरातील निर्गुडा नदीच्या काठावर असलेल्या एका प्रसिद्ध कॉलनीत नवीन लेआउट मध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉट फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित बिल्डरने नागरिकांना आकर्षक गेट, रुंद रस्ता व बंगलेच्या नकाशांचे आमिष दाखवून प्लॉट विक्री केली. प्रत्यक्षात मात्र कॉलनीचा मुख्य रस्ता स्थाहीय संस्थेच्या मालकीचा असून तेथे कुठलाही अधिकृत रस्ता नाही. तसेच मुख्य कमान एका खाजगी प्लॉटमध्ये बांधण्यात आलेली आहे.
या फसवणुकीमुळे संबंधित परिसरात वाहन, विशेषतः ट्रक जाणे अशक्य होणार असून नागरिकांना दुसऱ्या लेआउटमधून फेरा मारावा लागण्याची वेळ येणार आहे. या प्रकरणात काही शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. महत्वाचे म्हणजे, नागरपालिकेने अशा लेआउटला परवानगी कशी दिली, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांनी कोणतीही जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना ती जमीन नागरपालिका अथवा ग्रामपंचायतीच्या नकाशात नोंदणीकृत आहे की नाही, याची खात्री करावी. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच गुंतवणूक करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
-जागरूक नागरिक, वणी
