
वणी (प्रतिनिधी) – वणी शहरातील दामने फैल वार्ड, जो दलित वस्ती अंतर्गत येतो, येथील नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शौचालयातील गटारे पूर्णपणे भरलेली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गटारातील घाण पाणी थेट नदीत मिसळत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे डेंगू, मलेरिया व अन्य साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
शौचालयाचे नवीन बांधकाम मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले, परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. या संदर्भात माजी नगराध्यक्ष सुरेश रायपुरे यांनी ५ जून रोजी सिंधी कॉलनी गेट जवळ आमदार संजय देरकर यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र नगरपरिषद प्रशासकाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.

गुरुदेव सेना अध्यक्ष दिलीप भोयर यांनी ठिकाणी पाहणी केली व बातमी प्रसिद्ध केली. भोयर यांनी सांगितले की, मुख्याधिकारी बातमी पाहून पाहणीस येतील अशी अपेक्षा होती; मात्र अद्याप मुख्याधिकारी किंवा अन्य कोणीही जबाबदार अधिकारी ठिकाणी भेट दिलेली नाही. याच शैचालंयच्या मागच्या परिसरात मुख्याधिकारी राहतात आणि अनेक प्रशासकीय अधिकारी रोज सकाळी, सायंकाळी फिरायला येतात परंतु या वार्डाच्या समाजावर दुर्लक्ष होत असून यामुळे नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.

परिसरातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा न दिल्यास नागरिकांना आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी माजी नगराध्यक्ष रायपुरे यांनी व्यक्त केली आहे.
