
चंद्रपूर/राजुरा : सामाजिक न्याय मंत्रालयाच्या शिष्यवृत्ती पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अभ्यासक्रमात बदल (जसे बीएएमएस वरून एमबीबीएस) करणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्रीशीप योजनेचा अर्ज पोर्टलवर सबमिट करता येत नसल्याने शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळत नाही.
बामणवाडा येथील विद्यार्थी सार्थक सर्वानंद वाघमारे यांनी या समस्येबाबत सामाजिक न्याय मंत्री आणि मुख्य सचिव यांना निवेदन सादर केले. वाघमारे यांनी निवेदनात नमूद केले की,
“मी बीएएमएस कोर्स सोडून एमबीबीएस मध्ये प्रवेश घेतला असून, पूर्वीच्या कोर्सची ट्युशन फी शासनाला ३ लाख रुपये चलनाद्वारे परत केली आहे. तरीही पोर्टलवर अभ्यासक्रम बदलणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सुविधा नसल्याने फ्रीशीप मिळत नाही. त्यामुळे १५-२० लाख रुपये फी भरणे अशक्य झाले आहे.”
रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अशोककुमार उमरे आणि आदिवासी कार्यकर्ते प्रेमदास मेश्राम यांनी या संदर्भात सांगितले की,
“पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे अनेक गरीब, सर्वसामान्य आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने तातडीने या त्रुटी दुरुस्त करून न्याय द्यावा.”
सध्या शिक्षण आधीच महागडे झाले असून, शासनाच्या पोर्टलवरील त्रुटीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित दखल घेऊन अभ्यासक्रम बदलणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीशीप योजनेत योग्य बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
