
वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ती आणि स्पर्धा परीक्षेची विद्यार्थीनी कु. सिमा कुमरे या नगराध्यक्षपदासाठी प्रबळ चर्चेत आल्या आहेत. शहरात तसेच सोशल मीडियावरून अनेकांनी त्यांच्या उमेदवारीची मागणी व्यक्त केली आहे.
२८ वर्षीय कु. सिमा कुमरे या वणीतील प्रभाग क्रमांक ५ सिंधी कॉलनी येथे राहतात. त्या २०१६ पासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रियपणे सहभागी असून, शहरातील सामाजिक कार्यात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सिमा कुमरे या स्वतःच्या मेहनतीने आणि समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे युवकवर्गात लोकप्रिय आहेत. अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वणी तालुक्यात त्यांच्या नावाची चर्चा वाढत असून, त्या कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिमा कुमरे निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या, तर वणी नगराध्यक्षपदासाठी रंगतदार लढत होणार हे निश्चित मानले जात आहे.

