▪️‘सावध राहा’, सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन..

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या उमेदवारांबाबत चर्चा रंग घेत असतानाच सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या माहितीचा फैलाव वाढल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील काही व्यक्तींना शहरात बोलावून खोटा प्रचार केल्याचे आरोपही समोर आले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “सोशल मीडियावर माहिती पसरवणारी व्यक्ती प्रत्यक्षात वणी शहरातील आहे का, हे ओळखणे अत्यावश्यक आहे.” स्थानिक व्यक्तीच प्रभागातील समस्या, पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा प्रत्यक्ष अनुभव सांगू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मतदारांमध्ये अशी मागणी वाढत आहे की उमेदवारांची निवड केवळ पक्षाधिष्ठित न करता, त्यांच्या सामाजिक कार्याचा मागोवा, प्रामाणिकता व स्थानिक प्रश्नांसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आधारे करावी. काही प्रभागांत स्थानिक नसलेल्या व्यक्तींना उमेदवारी मिळाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेले मुख्य प्रश्न
- दुसऱ्या प्रभागातील व्यक्तीला निवडून दिल्यास स्थानिक समस्या सुटतील का?
- नागरी सुविधा व विकासकामे वेळेत पूर्ण होतील का?
- समाजासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या, प्रामाणिक उमेदवारांनाच संधी मिळेल का?
शहराच्या दलित वस्त्यांतील न सुटलेल्या समस्यांमुळे काही उमेदवारांना यंदा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरिता ७ महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तिहेरी लढत होणार अनेक प्रभागांमध्ये तिहेरी व चुरशीची लढत अपेक्षित आहे. विशेषतः प्रभाग क्र. ४, ५, ६, ९, १३ व १४ येथे १९ नोव्हेंबरपासून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व संभाव्य उमेदवार यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.
निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे.
एकूणच, जागरूक मतदारच योग्य, पात्र व कार्यक्षम उमेदवारांची निवड करतील, अशी शहरात व्यापक चर्चा आहे.
