Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या दामले फैल मागासवस्ती परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अनेक वर्षांपासून नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक शौचालयात नियमित व सखोल स्वच्छता केली जात नसून केवळ औपचारिक स्वरूपात साफसफाई केली जाते. सफाई कर्मचारी दररोज एक-दोन बादल्या पाणी टाकून निघून जात असल्याने महिला व पुरुष शौचालयांमध्ये अस्वच्छता कायम आहे. शौचालयातील खोल्या जीर्ण झाल्या असून अनेक ठिकाणी दरवाजेच नाहीत. शौचालयातील सीट तुटलेल्या व घाणीने भरलेल्या आहेत. पाण्याची टाकी असूनही अनेक वर्षांपासून नळांना पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

शौचालय परिसरातील गटारे कचऱ्याने तुंबलेली असून सर्वत्र दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अपुऱ्या सुविधांमुळे काही महिलांना शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उघड्यावर शौचास जावे लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. या शौचालयामागील गारडन या नाव्याने कॉलनी विकसित होत असून याच मार्गावरून दामले लेआउट नागरिकांची सतत ये-जा होत असल्याने त्यांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा नगरपालिकेसह संबंधित विभागाकडे लेखी तक्रारी व निवेदने सादर केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या मते, ही समस्या अनेक वर्षांपासून कायम असून दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. नियमित देखभाल, स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने गोरगरीब नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, सभापती, संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

याशिवाय, प्रभागाच्या विकासाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. शहरातील इतर भागांत विकासकामे झाली असताना दामले फैल परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव का कायम आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या सात महिन्यांत प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनी कोणते ठोस प्रयत्न केले, याबाबतही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न तातडीने सोडवून शौचालयाची दुरुस्ती, नियमित स्वच्छता, अखंड पाणीपुरवठा, गटारांची साफसफाई आणि परिसराचे स्वच्छता व्यवस्थापन त्वरित करण्यात यावे, अन्यथा नागरिकांच्या वाढत्या संतापाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Continue Reading

Previous: महाराष्ट्र आर्थिक संकटात; राज्यावर 12 लाख कोटींपेक्षा अधिक आर्थिक बोजा – ॲड. वामनराव चटप
Next: उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

Related Stories

ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
ChatGPT Image Aug 25, 2026, 01_40_53 PM_11zon
  • वणी

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

NewWaniDiary 25/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.