▪️बाहेरील व्यक्तींचा सहभाग; लाखोंच्या उलाढालीची चर्चा, अवैध मद्यविक्रीबाबतही प्रश्नचिन्ह..

वणी (प्रतिनिधी) : वणी शहरातील काही भागांत दररोज रात्री उशिरापर्यंत जुगार सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत असून, या जुगारासाठी वणी विधानसभा क्षेत्राबाहेरील काही व्यक्ती येत असल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. जुगाराच्या ठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा असून, मागासवस्तीतील काही तरुण या प्रकारात अडकत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रकारांमुळे भविष्यात अनुचित घटना घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
दि. २५ व २६ सप्टेंबर तसेच दि. २ ऑक्टोबर रोजी शहरातील अनेक बार बंद असताना, शहरातील मुख्य चौकातील एका बारमधून मद्यविक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. संबंधित बार भाडेतत्त्वावर दिलेला असल्याचे सांगितले जात असून, त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले का, याची संबंधित विभागाने प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
याशिवाय काही मद्यविक्रीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी रात्री ३ वाजेपर्यंत मद्यविक्री सुरू असल्याची चर्चा असून, या बाबीची सत्यता तपासून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तरुणांच्या भवितव्याबाबत पालक चिंतेत
शहरातील जुगाराच्या प्रकारात शिक्षण घेणारे तरुणही अडकत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही तरुण पहाटेपर्यंत जुगाराच्या ठिकाणी थांबून पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घरी परतत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तरुणांच्या भवितव्याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्य सूत्रधारांवर कारवाई कधी?
शहरात मागील काही वर्षांपासून अवैध धंद्यांबाबत अधूनमधून चर्चा होत असून अधिकारी बदलत राहतात; मात्र जुगार चालविणाऱ्या मुख्य व्यक्तींवर ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. अवैध धंद्यांचा विषय चर्चेत आल्यानंतर जुगारात सहभागी तरुणांवर किरकोळ कारवाई होते; मात्र जुगार चालविणाऱ्या मुख्य व्यक्तींवर कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
अवैध धंद्यांवर पोलिसांचा अपेक्षित धाक दिसत नसल्याची नाराजी नागरिकांमध्ये असून, जुगाराचे मुख्य सूत्रधार आणि त्यांना सुविधा उपलब्ध करून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
राजकीय संबंधांच्या चर्चेची सत्यता तपासण्याची मागणी
अवैध मद्यविक्री व जुगाराशी संबंधित काही व्यक्ती माजी नगरसेवक असल्याची तसेच काहींचे राजकीय क्षेत्राशी संबंध असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, या चर्चेची सत्यता संबंधित पोलीस व प्रशासनाने तपासावी, अशी मागणी होत आहे.
गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुगाराचे अड्डे, अवैध मद्यविक्री आणि इतर अवैध धंद्यांवर विशेष पथकाद्वारे तपासणी करावी. दोषी आढळणाऱ्यांवर कोणताही दबाव न ठेवता कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील अवैध धंद्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सत्यता पडताळावी आणि जुगार, अवैध मद्यविक्रीसह गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
