▪️ आकर्षक विद्युत रोषणाई अन् किल्ल्याच्या देखण्या प्रवेशद्वाराने उत्सवाला विशेष रंगत..

वणी (प्रतिनिधी) : वणी शहरातील पोलीस ठाणे परिसरात साजऱ्या होणाऱ्या अमरदीप दुर्गा उत्सव मंडळाची ४२ वर्षांची परंपरा यंदाही कायम आहे. सन १९८४ मध्ये सुरू झालेल्या या उत्सवात यंदा ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुर्गादेवीची घटस्थापना करण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई, किल्ल्याच्या रचनेतील देखणे प्रवेशद्वार आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
वणीतील ज्येष्ठ नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या उत्सवाची सुरुवात यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) मधुकर नागभिडकर यांनी केली. पुढे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मित्रपरिवाराच्या सहकार्याने या उत्सवाची परंपरा अधिक दृढ झाली.
बदली झाली, तरी उत्सवाशी नाळ कायम!
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात; मात्र अमरदीप दुर्गोत्सवाशी जोडलेले भावनिक नाते कायम राहते. बदली झाल्यानंतरही काही माजी अधिकारी व कर्मचारी नवरात्रोत्सवाच्या काळात आपल्या कुटुंबीयांसह उत्सवाला भेट देतात. अमरदीप दुर्गा उत्सव मंडळाच्यासह या उत्सवाशी जोडलेल्या व्यक्तींच्या आठवणी आणि सहभागामुळे पोलीस परिवारातील जिव्हाळ्याचे नाते आजही अनुभवायला मिळते.

वर्षानुवर्षे श्रद्धा, परंपरा आणि एकोपा जपत सुरू असलेला हा उत्सव केवळ धार्मिक आयोजन न राहता पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जोडणारा भावनिक दुवा ठरला आहे. बदलत्या काळातही अमरदीप दुर्गोत्सवाची परंपरा उत्साहाने पुढे सुरू असून, वणी शहरात या उत्सवाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
न्यू वणी डायरी न्यूज पोर्टल
सामान्य जनतेचा आवाज… जनतेसाठी!
