
वणी(प्रतिनिधी) – वणी तालुक्यातील उकणी वेकोलि खाण परिसराच्या अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांचा मोबदला, शाळकरी मुलांच्या बससेवा तसेच इतर प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून विराट चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन तब्बल साडेतीन तास चालले. परिसरातील शेकडो गावकरी, वेकोलि कर्मचारी, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अखेर वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन रस्ते व इतर समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय खाडे यांनी केले. त्यांनी आंदोलकांचे आभार मानताना इशारा दिला की, जर वेकोलिने पुन्हा मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर यापेक्षा मोठे आंदोलन उभारले जाईल. आमचा लढा सुरूच राहील.