
वणी प्रतिनिधी:
सध्या देशभरात ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेलेले तरुण-तरुणी आपलं शिक्षण, नोकरी, नाती, आणि आयुष्य गमावत आहेत. “फक्त फनसाठी” म्हणून सुरू झालेला हा नाद आता आधुनिक जुगाराच्या स्वरूपात समाजातील अनेक कुटुंबांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे. विशेषतः रम्मी, फँटसी लीग, कॅसिनो यांसारख्या गेममुळे तरुण पिढी आत्महत्या, नैराश्य, आणि मानसिक विकारांकडे झुकत आहे.
या पार्श्वभूमीवर सक्षम बहुउद्देशीय संस्था, वणी तर्फे “हरवलेलं भविष्य एका ऑनलाइन क्लिकमध्ये” या विषयावर जनजागृतीपर लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक कर्मा तेलंग यांनी या लेखातून समाजाला साद घातली असून, पालक, शिक्षक, आणि नागरिकांनी एकत्र येऊन या डिजिटल जुगाराच्या विळख्यातून तरुणांना बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेचा उद्देश आहे की –
तरुणांना वेळेत या व्यसनातून बाहेर काढणं
पालकांनी केवळ मोबाइल देऊन न थांबता मुलांशी संवाद साधणं
आणि संपूर्ण समाजाने सजग नागरिक म्हणून जबाबदारी स्वीकारणं
“मोबाइलवर गेम खेळून काही जिंकलं जात नाही, पण हरवतं मात्र खूप काही – म्हणून आजपासून सजग व्हा आणि खरं आयुष्य जगायला सुरुवात करा”, असं आवाहन कर्मा तेलंग यांनी केलं आहे.
या जनजागृती लेखाद्वारे सक्षम संस्था नव्या पिढीला एक सकारात्मक दिशा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

