Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • महाराष्ट्र
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा
  • महाराष्ट्र
  • मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनामुळे समाजात अस्पृश्यता व भेदभावाच्या विरोधात सुधारणा

NewWaniDiary 07/12/2024
  • राज्यपाल सी. पी राधाकृष्णन

मुंबई, दि. ०६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितले.

दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी राधाकृष्णन संबोधीत करीत होते.

कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार सर्वश्री नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदी उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, बाबासाहेब जातीयवादापासून मुक्त राष्ट्र पाहू इच्छित होते, जिथे प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि विकासाची समान संधी मिळेल. दारिद्र्य, असमानता यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणात आहे, हे आपण जाणतो. शिक्षणाच्या विचारांना बळ देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातील विविध राज्यांतूनही अनुयायी येतात. त्यांचे अतूट प्रेम, आदर आणि शिस्तबद्ध आचरण खरोखरच प्रेरणादायी आहे.

देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले.

  तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला समता, एकता, बंधुतेचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात दिसत असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाबासाहेब द्रष्टे, अभ्यासू व व्यासंगी व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यावेळी कायदा, पाटबंधारे, मजूर व वीज मंत्री म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ हा पायाभूत सोयी – सुविधांची मुहूर्तमेढ करणारा ठरला आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलल्या कामातून संविधानाचा अंमल दिसून येतो. 

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  सध्या देशाच्या प्रमुख नीती, धोरणांमध्ये बाबासाहेबांनी तेव्हा केलेल्या भविष्यातील संकल्पनांचा अंतर्भाव दिसून येतो. यावरून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांचे लिखाण एक प्रमाण म्हणून मानल्या जाते. त्यांनी तेव्हा लिहीलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. देशासमोर कुठल्याही प्रकारची समस्या येवू दे, त्या सोडवण्याचा उपाय भारतीय संविधानामध्ये आहे. असे जगात सर्वात  सुदर असलेले संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले आहे. 

  इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल. राज्यात शासन नेहमी वंचित,दुर्बल घटकांच्या कल्याणाचा पहिल्यांदा विचार करणार असून संविधानाच्या अनुरूप कार्य करेल,असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामध्ये आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार आहे. त्यांनी दिलेले संविधान हे कायम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा उपयोग आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हे विचार कुठेही कमी पडणार नसून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानून शासनाचा कारभार

  • उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार असणार आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार शासन करणार असून त्यामुळे त्यांच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

 उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे. बाबासाहेबांच्या विचारात देशाला बंधुता, एकता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे. अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. येथे आलेला हा अथांग जनसागर त्याचेच प्रतिक आहे.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.


Continue Reading

Previous: वणी विधानसभा मतदारसंघातील‌ प्रत्येक‌ गावात‌ भारतिय‌ कम्युनिस्ट पक्षाच्या शाखा परिषदा घेणार -काॅ.अनिल हेपट ‌‌‌‌‌‌‌‌
Next: कोयला श्रमिक सभा संघटनेत: संजय खाडे यांची नागपूरच्या सुरक्षा समिती सदस्यपदी नियुक्ती

Related Stories

SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
SAVE_20251216_200159
  • मुंबई
  • वणी

माजी आमदार विश्वास नांदेकर यांची लीलावती रुग्णालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

NewWaniDiary 17/12/2025
SAVE_20250816_200833
  • महाराष्ट्र

माहीममध्ये भूखंड वाचवण्यासाठी झेंडावंदन; नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

NewWaniDiary 16/08/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.