
वणी (प्रतिनिधी) : वणी नगरपालिकेने नुकतीच मालमत्ता कराची नवीन आकारणी केली असून हा कर मागील कराच्या दुप्पट-चौपट आहे. या करवाढीविरोधात आज दि. २२ सप्टेंबर रोजी वणी विधानसभा क्षेत्र काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे मार्फत मुख्याधिकारी, नगर परिषद वणी यांना निवेदन देण्यात आले.
नवीन कर आकारणीबाबत कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही. तसेच पुढील चार वर्षांसाठी ही करवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वणीकरांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे काँग्रेस कमिटीने निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, वणी शहरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित आहे. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात रस्त्यांवर डबकी साचतात. शहरातील अनेक भागात झाडे-झुडपे वाढली असून पालिकेचे त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. अशा परिस्थितीत कोणतीही मूलभूत सुविधा न देता करवाढ लादणे जुलमी व अन्यायकारक आहे.
ही करवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा काँग्रेसतर्फे पालिकेसमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे, अशोक चिकाटे, प्रफुल उपरे, रामदास कुचनकार, संदीप कांबळे, रवी कोटावार, राजू डवरे, राजा पाथडकर, प्रेमनाथ मंगाम, कैलास पचारे, सुधीर खंडाळकर, कैसर पटेल, ओम ठाकूर, विकेश पानघाटे, अशोक पांडे, राजू मंथनवार, गणेश बोंडे, तोहीद अहमद यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
