
वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. २२ नोव्हेंबर रोजी शेतकरी मंदिर, वणी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एमआयएम (MIM) पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. या निर्णयानंतर वणी नगरपरिषद निवडणुकीचे राजकीय चित्र अधिकच रंगतदार झाले आहे.
एमआयएमचे प्रभाग क्र. ८, ९ आणि १० मधील चार उमेदवार निवडणुकीत रिंगणात आहेत. काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण सरळ लढत होणार असून, काही प्रभागांमध्ये युतीद्वारे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी संयुक्तपणे रणनिती आखण्यात येत आहे. निवडणूक ताकदीने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि पूर्ण एकजुटीने लढवण्याचा निर्धार या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.

या नव्या राजकीय समीकरणामुळे भाजप आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे वणी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दिलीप भोयर, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, एमआयएमचे शहराध्यक्ष आसिम हुसेन, तसेच दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
