▪️वाढती वाहतूक व अतिक्रमणामुळे अपघातांचा धोका; प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी..

मारेगाव (प्रतिनिधी) : मारेगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व मार्डी चौकात वाढत्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील आजूबाजूच्या १०८ गावांमधून विद्यार्थी, वृद्ध तसेच विविध शासकीय व इतर कामांसाठी नागरिक दररोज मारेगाव येथे येत असतात.
शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, या परिसरात अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व मार्डी चौकात सिग्नल लाईट बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे तसेच दोन ट्राफिक हवालदारांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी यवतमाळ जिल्हा पत्रकार संघटना, साप्ताहिक ‘विदर्भाच्या लेखणीतून’, एकता बहुउद्देशीय संस्था व रायपुरे परिवार, मारेगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या मार्फत विनंती अर्ज सादर करण्यात आला आहे. या मागणीसाठी यापूर्वीही दोन वेळा विनंती अर्ज सादर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन दोन्ही चौकांमध्ये सिग्नल लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दोन ट्राफिक हवालदारांची कायमस्वरूपी नियुक्ती करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

