▪️चोरीचा मुद्देमाल व वाहन असा एकूण ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

वणी (प्रतिनिधी) : भांदेवाडा परिसरातील जिओ टॉवरमधून डिझेल व बॅटरी चोरी केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल तसेच चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस स्टेशन वणी येथे जिओ टॉवरमधील डिझेल व बॅटरी चोरीबाबत दि. २६ जुलै २०२६ रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा क्र. ४९४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अरशिल अकील शेख (वय २५) व अमान शाहीद शेख (वय २१), दोघे रा. राजूर कॉलरी, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी भांदेवाडा परिसरातील जिओ टॉवरमधून डिझेल व बॅटरी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चोरी केलेले डिझेल हायवेवरील वाहनचालकांना विकून ११ हजार ४०० रुपये मिळविल्याचे समोर आले. तसेच चोरीची बॅटरी किंमत १० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चोरी करताना वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल क्र. MH 34 J 5791, अंदाजे १० हजार रुपये किमतीची, असा एकूण ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भानुदास दिपकर यांच्या नेतृत्वात पोउपनि साजिद सय्यद, पोहेकॉ गजानन सावसाकडे, पोका रितेश भोयर, गणेश मेघ्राम, मोनेश्वर खंडारे व नंदकुमार पुप्पलवार यांनी केली.
