
वणी (प्रतिनिधी) : वणी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील मागासवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दामले फैल परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. शौचालयाची अवस्था खराब असतानाही नागरिकांना त्याचा वापर करावा लागत असल्याने परिसरात अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली आहे.
या सार्वजनिक शौचालयात महिलांसाठी सहा, तर पुरुषांसाठी सहा खोल्या आहेत. मात्र, विशेष स्वच्छता कंत्राटदाराकडून नियमित पाहणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सफाई कर्मचारी दररोज वेळेवर येत नसल्याचीही तक्रार आहे. शौचालयातील महिलांच्या व पुरुषांच्या खोल्यांमध्ये दोन-दोन बादल्या पाण्यात फिनाइलसदृश द्रव्य मिसळून टाकले जात असल्याचे शौचालयाचा वापर करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे. या पाण्यातील औषधाचा सुगंधही जाणवत नसल्याने स्वच्छतेसाठी नेमके कोणते द्रव्य वापरले जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कंत्राटदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांना योग्य स्वच्छता साहित्य व निर्जंतुकीकरणाची साधने दिली जातात का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

शौचालय परिसरात घाण साचली असून, तुंबलेल्या गटारांमधून सांडपाणी बाहेर वाहत असल्याने परिसरात मच्छरचा वावर व दुर्गंधी पसरली आहे. मंदिर व शाळेकडे जाणाऱ्या या रस्त्याचा दामले लेआउटमधील अनेक नागरिक वापर करतात. मात्र, रस्त्यालगत उघड्यावर शौचास बसणे आणि कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याने लहान मुले, विद्यार्थी व इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रस्त्यावरील विद्युत खांबांवरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अडचणी वाढत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पहाटे ५ ते सकाळी ९ आणि दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत शौचालय परिसरात नागरिकांची वर्दळ असते. नगरपरिषदेची कचरा गाडी नियमित येत असतानाही काही नागरिक कचरा गाडीत टाकण्याऐवजी शौचालयाजवळील रस्त्यावर टाकत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढत आहे.
दरम्यान, या परिसरात नवीन सार्वजनिक शौचालय मंजूर झाल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्ष कामाबाबत स्पष्टता नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तातडीने पाहणी करून शौचालयाची नियमित स्वच्छता, योग्य निर्जंतुकीकरण, गटारांची सफाई आणि परिसरात औषध फवारणी करावी. तसेच, नियमित सफाईसाठी स्वतंत्र कर्मचारी पथक नेमावे, बंद पथदिवे सुरू करावेत आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याशिवाय, अस्वच्छता रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचाही पर्याय विचारात घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
