▪️ ग्रामीण रुग्णालय परिसरात तासभर नळाचे व्हॉल्व्ह सुरू; मोठ्या बांधकामांतील पाणीवापरावर नियंत्रणाची मागणी..

वणी (प्रतिनिधी) : राज्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पाणी बचत, जलसंधारण आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करण्यावरही भर दिला जात आहे. मात्र, वणी शहरात काही बांधकामस्थळी होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे पाणी बचतीच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात नवीन THO कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना आज दि. १२ ऑक्टोबर रोजी, सकाळी १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत नळाचे व्हॉल्व्ह उघडे ठेवून पाणी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात किती पाण्याचा अपव्यय झाला, हे स्पष्ट झालेले नाही.
हा परिसर प्रभाग क्रमांक ५ मध्ये येतो. याच प्रभागातील तेली फैल परिसरातही दोन दिवसांपूर्वी एका माजी लोकप्रतिनिधींच्या बांधकामस्थळी पाणी वाया गेल्याची चर्चा होती. शहरातील काही भागांत अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी होत असताना बांधकामस्थळी पाण्याचा होणारा वापर नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे.
मोठ्या बांधकामांतील पाणीवापरावर नियंत्रण आणणार का?
वणी शहरालगतच्या ग्रामीण भागात काही मोठ्या लेआउटमध्ये तसेच नवीन इमारतींच्या खोदकाम व बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पाणी बचतीबाबत शासनाकडून आवाहन केले जात असताना अशा बांधकामांना परवानगी देताना पाण्याची उपलब्धता, वापराचे नियोजन आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांचा विचार केला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्याच्या परिस्थितीत पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन मोठ्या बांधकामांवरील पाणीवापराचे नियमन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, सर्व मोठी बांधकामे तातडीने थांबविण्याबाबत कोणते अधिकृत निर्देश आहेत, याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
ग्रामीण रुग्णालय परिसरातील घटनेची चौकशी करून पाणी कोणाच्या निर्देशाने सोडण्यात आले, याची माहिती स्पष्ट करावी. तसेच नगर परिषद व संबंधित प्रशासकीय विभागांनी पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
न्यू वणी डायरी — सामान्य जनतेचा आवाज
