▪️सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची कारवाई..

वणी (प्रतिनिधी) : आगामी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शिरपूर पोलिसांनी दोन महत्त्वपूर्ण कारवाया केल्या आहेत. चोरी, घरफोडी व अवैध दारूविक्रीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा उल्लेख असलेल्या सराईत गुन्हेगार शेख आशिक ऊर्फ तोत्या शेख इब्राहीम (वय ३५, रा. कुरई, ता. वणी, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, सन २०१३ मधील गुन्ह्यात गेल्या १३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले.
शेख आशिक ऊर्फ तोत्या याच्यामुळे आगामी सण-उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने त्याला वणी, मारेगाव व संबंधित परिसरातून तडीपार करण्यात आले आहे.
दरम्यान, सन २०१३ मध्ये निलजई (WCL) परिसरात सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सलमान खान समशाद खान पठाण (वय ३५, रा. उत्तर प्रदेश) हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. फरार आरोपी शोध मोहिमेंतर्गत यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून त्याला अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर करून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक गुल्हाणे, पोलीस हवालदार सुनील दुबे, अजय वाभिटकर, पोलीस शिपाई किरण दासरवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुडमेथे तसेच होमगार्ड मोहन घागी यांनी पार पाडली.
न्यू वणी डायरी न्यूज पोर्टल
