
वणी – निलजई येथे एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपन्यांनी 65 कामगारांना नोकरीतून कमी केल्यामुळे हे कामगार सोमवारपासून कंपनीच्या गेटसमोर उपोषणाला बसले आहेत. तिसऱ्या दिवशी वेकोलिचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी कंपनीच्या मॅनेजर व इनचार्ज सोबत चर्चाही केली, मात्र व्यवस्थापनाचा अडेलतट्टूपणा दिसून आला.
कामगारांच्या या समस्या लढ्यासाठी स्थानिक खासदार, आमदार व अधिकारी अद्याप पुढे आलेले नाहीत. त्यामुळे कामगारांनी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. संजय खाडे वरिष्ठ स्तरावर चर्चा करत असून, कामगारांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे.

स्थानिकांना रोजगार देणे कंपनीचे कर्तव्य असून, या कंपनीत इतर राज्यातील लोकांना काम दिले जात असताना लोकप्रतिनिधी आणि कंपनी स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला जात आहे. कंपनीने कामगारांना तात्काळ पुन्हा नोकरीवर घ्यावे, अशी मागणी होत आहे. सुमारे 40-50 कामगार उपोषणाला बसले असून त्यात विशाल गोवारदीपे, कानुजी लोनगाडगे, प्रभाकर खोब्रागडे, संदीप भोयर यांसारख्या कामगारांचा समावेश आहे.
