
वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीत चुरशीची लढत रंगत असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. १० नोव्हेंबरपासून नामांकन दाखल प्रक्रिया सुरू झाली असून आज (१६ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षातर्फे दमदार शक्ती प्रदर्शन करत बँड-बाजांसह भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
वणीचे कुलदैवत श्री रंगनाथ स्वामी मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजी व ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमले. मिरवणूक तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यावर नगराध्यक्षा पदासह २९ नगरसेवकांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले.
या वेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेंडे, रवि बेलुरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
