
वणी (प्रतिनिधी) – वणी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कोरपना येथील रहिवासी मोहब्बत खान सत्तार खान यांनी ७ ऑगस्ट रोजी, वणी सार्वजनिक बांधकाम उपविभागातील वरिष्ठ लिपिक यांच्या उद्धट वर्तनाविरोधात तक्रार केली असून, त्यांच्या कार्यालयीन गैरहजेरीच्या सवयींबाबतही संताप व्यक्त केला.
या प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, जिल्हाधिकारी यवतमाळ, कार्यकारी अभियंता पांढरकवडा व उपविभागीय अभियंता वणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, माहिती अधिकार कायद्यानुसार केलेल्या अर्जासंदर्भात चौकशीसाठी खान यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वणी कार्यालयात भेट दिली असता संबंधित अधिकारी अनुपस्थित होत्या. फोनवर संपर्क साधल्यावर त्यांनी अत्यंत उद्धट भाषेत संवाद साधला आणि कामासंदर्भातील माहिती देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर “तुमच्यासारखे हवशे-नवशे आले आणि गेले” अशा प्रकारची अपमानास्पद भाषा वापरल्याचा गंभीर आरोपही खान यांनी केला आहे.
या वर्तनामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होत असून, अशा कर्मचाऱ्यांवर त्वरित शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित प्रकरणासंदर्भात आवश्यक पुरावे आणि फोन कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन राखणे अपेक्षित असते. मात्र, अशा प्रकारचे अपमानास्पद वर्तन हे शासनाच्या आचारसंहितेला हरताळ फासणारे असल्याचे नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
