
वणी (प्रतिनिधी) – वणी ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या — औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव, ट्रॉमा केअर सेंटरमधील सुविधा अपुरी असणे यावर आता ठोस पावले उचलली जात आहेत. आज आमदार संजय देरकर यांनी जिल्हाधिकारी श्री. विकास मीना यांच्यासह थेट रुग्णालयाला भेट देऊन सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला.


या भेटीत, स्थानिक विकास निधीतून रुग्णालयाची दुरुस्ती, कंपाऊंड वॉलचे बांधकाम, वातानुकूलन यंत्रणा बसविणे आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच, शासनस्तरावरून औषधे व वैद्यकीय साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे, याबाबतही संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून वणीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी या समस्यांकडे लक्ष वेधले होते. परंतु अद्याप ठोस कारवाई होत नव्हती. यावेळी आमदार संजय देरकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन समस्यांची गांभीर्याने दखल घेतल्यामुळे, वणीतील नागरिकांना तातडीच्या व दर्जेदार आरोग्य सेवा लवकरच उपलब्ध होतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

