
वणी (प्रतिनिधी) : वणी शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील बसस्थानक परिसरातील तेली फैल येथे दि. ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
तेली फैल परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे. या उत्सवाला वणी शहरासह परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. तसेच विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उत्सवाला आवर्जून उपस्थित राहत असल्याने तेली फैल परिसराची श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवासाठी विशेष ओळख निर्माण झाली आहे.
जन्माष्टमीच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. वणी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख आनंदोत्सवांपैकी एक म्हणून तेली फैल येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाकडे पाहिले जाते.

