
वणी, १६ मे २०२५ रोजी – वणी तालुक्यातील कोरंबी गावच्या युवकासोबत एक गंभीर आणि दुःखद घटना घडली असून ती तालुक्यातील वाढत्या दारू व्यसनाच्या समस्येकडे लक्ष वेधते. चटप च्या लग्नसमारंभात गेला आणि मित्रांसोबत दारू सेवन करून मोटारसायकलवरून परतत असताना तीव्र वेगात गाडी चालवली जात होती. यावेळी वाहन स्लिप होऊन तो थेट डिव्हायडरवर आदळला आणि गंभीर जखमी झाला.
घटनास्थळावरून त्याला तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले.
अपघातग्रस्त तरुणाचे कुटुंब आधीच अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे. त्याची आई कॅन्सरने त्रस्त असून वडिलांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली आहे. मोठा भाऊ देखील दारूच्या आहारी जाऊन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत गावात भटकत आहे. सध्या नातेवाईकांनी त्याला चंद्रपूर येथे नेले आहे.
कोरोना लॉकडाऊन दरम्यान देखील वणी परिसरात अनेकांनी दारूच्या अभावात सॅनिटायझर प्यायल्याने प्राण गमावले होते, हे लक्षात घेता समाजासाठी खेदजनक आहे.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि या गंभीर सामाजिक समस्येबाबत चिंता व्यक्त केली.
वणी तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणावर दारूच्या आहारी जात असून, शासन आणि समाजाने वेळेत हस्तक्षेप न केल्यास अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
