
वणी (प्रतिनिधी) – दि. २३ जून २०२५ रोजी क्रांतिवीर बिरसा मुंडा नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. ९, वणी येथे नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्ग पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवख्या विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश रायपुरे आणि दीपक शिंगेडवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच दिनेश रायपुरे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना बुक व पेन भेट देण्यात आले.

या साहित्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते “द ग्रेट पिपल्स ग्रुप” तर्फे १४ एप्रिल रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक पुष्पहाराऐवजी पुस्तके भेट देण्याच्या उपक्रमातून संकलित करण्यात आले होते. या उपक्रमाची फलश्रुती म्हणून आज विद्यार्थ्यांना हे साहित्य प्रदान करण्यात आले.

यावेळी शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, तर वर्ग पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणवेशही देण्यात आला. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कोटरंगे मॅडम आणि शिक्षक डंभारे सर, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
