
वणी (प्रतिनिधी) – वणी शहरालगत असलेल्या लालगुडा ग्रामपंचायत हद्दीतील पटवारी कॉलनीच्या मागील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. विशेष म्हणजे, संबंधित रस्ता आमदार संजय देरकर यांच्या लेआउटला लागून असूनही, प्रशासनाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत सांगितले की, “या परिसरात केवळ तीन महिन्यांपूर्वी काही नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, एवढ्या कमी कालावधीतच रस्त्याला तडे गेल्याचे दिसून येत असून, या कामाची सखोल चौकशी व्हावी.”

ते पुढे म्हणाले, “जर आमदारांच्या शेजारील परिसरातच असा रस्त्यांचा दर्जा असेल, तर इतर अंतर्गत भागांची काय अवस्था असेल, याची सहज कल्पना करता येते.”
स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना जाने कठीण झाले आहे. नागरिकांनी या भागातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
