
वणी (प्रतिनिधी) : दि. २१ जून रोजी बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, महिला पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज वणी येथे भव्य योगशिबिराचे आयोजन करण्यात आले. भारत मातेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एस. बी. लॉन, वणी येथे सकाळी ५.४५ ते ७ वाजेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क योगशिबिरात विविध योगासने, प्राणायाम तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या प्रोटोकॉलनुसार योगशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “निरोगी वृद्धत्वासाठी योग (Yoga for Healthy Ageing)” अशी असून, वाढत्या वयात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. योग हा भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग असून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सौ. विद्या आत्राम उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित योगसाधकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन सौ. विजया दहेकर यांनी केले, तर प्रास्ताविक महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा सौ. मायाताई माटे यांनी केले. प्रा. महादेव खाडे यांनी विविध योग वर्गांतील योग शिक्षक व प्रशिक्षकांचा परिचय करून दिला.
मंचावर योग प्रात्यक्षिकासाठी सौ. मायाताई माटे, कुंदाताई सावसाकडे, रमेश बोबडे, विजया दहेकर, ज्योत्स्ना खोकले, उषा चिकटे, मनीषा बल्की, लिला लेडांगे, संगीता चिकटे, निशा ढुमणे, सुषमा मोहितकर, प्रतिभा चहाणकर आणि कुसुम गिरी उपस्थित होत्या.
महिला पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांसह योगशिक्षक-शिक्षिका, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक या योगशिबिरात सहभागी झाले. नियमित योगसाधकांनी पांढऱ्या रंगाच्या पोशाखात उपस्थित राहून योग दिनाला विशेष स्वरूप प्राप्त करून दिले.

यावेळी दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, रवीजी बेलुरकर, ॲड. निलेश चौधरी, राकेश बुग्गेवार,लक्ष्मण उरकुडे, दिपक पाऊणकर, हितेन अटारा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. महादेव खाडे, सौ. माया माटे, सौ. कुंदा सावसाकडे, ॲड. निलेश चौधरी तसेच महिला पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या योगशिबिरातून “योग करा, निरोगी रहा” हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
