
वणी (प्रतिनिधी) : दिल्ली येथील जंतर-मंतरवर दि. २० जून २०२६ रोजी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “कॉकरोच जनता पार्टी”च्या आंदोलनाला वणीतील युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेने एकमुखी जाहीर व सक्रिय पाठिंबा दर्शविला.
विविध स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, वाढती बेरोजगारी तसेच शिक्षण क्षेत्राचे वाढते खाजगीकरण या मागण्यांच्या समर्थनार्थ शनिवारी (दि. २० जून) सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, टिळक चौक, वणी येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, AISF संघटना तसेच विविध स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले. याशिवाय वणी वकील संघ आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीनेही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
युवकांच्या भविष्याशी निगडित गंभीर प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी, वाचनालयातील अभ्यासक, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणारी आणि सुशिक्षित युवकांची संघटना म्हणून ओळख असलेली युवाशक्ती क्रांतिकारी संघटना मागील अनेक वर्षांपासून युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत आहे.
केंद्र सरकारने विद्यार्थी व युवकांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा युवाशक्ती क्रांतिकारी संघटना वणी तालुक्यात भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
