
वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या दामले फैल परिसरात वाढत्या मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे आज, दि. २० जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास नगर परिषदेमार्फत मच्छरनाशक मशीनद्वारे फवारणी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक रितिक मामिडवार यांनी स्वतः नगर परिषद कर्मचाऱ्यांसोबत परिसराची पाहणी करून मच्छरांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी फवारणीचे काम करून घेतले. विशेषतः सार्वजनिक शौचालय परिसरासह इतर संवेदनशील भागांमध्ये फवारणी करण्यात आली.
दरम्यान, परिसरातील काही नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेबाबत नगरसेवकांकडे विचारणा केली. त्यावर नगरसेवक रितिक मामिडवार यांनी सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीच्या कामास नगर परिषदेकडून मंजुरी मिळाल्याचे सांगितले. तसेच येणाऱ्या दिवाळीपर्यंत या कामास सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी प्रभागातील रस्ते, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा व इतर मूलभूत नागरी सुविधांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
