३६ वर्षांच्या सेवापर्वाचा कृतज्ञतापूर्वक गौरव; सामुदायिक प्रार्थना, भजन व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन..

वरोरा (प्रतिनिधी) : पश्चिम कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मध्ये तब्बल ३६ वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने व कर्तव्यभावनेने सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले भोजराज फकरू कारेकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती व सेवानिवृत्ती निमित्त वरोरा येथे भावपूर्ण व आध्यात्मिक वातावरणात गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भजनाने झाली. त्यानंतर संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर आधारित सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा यांच्या सहकार्याने झालेल्या या सामुदायिक प्रार्थनेमुळे संपूर्ण कार्यक्रमाला आध्यात्मिक व प्रसन्न वातावरण लाभले. कार्यक्रमाचे संचालन नीता बोढे यांनी केले.
या सोहळ्यास सदगुरु शेषानंद पांडे महाराज, संस्थापक – आदिनाथ गुरु माऊली, बरबडी लक्ष्मणराव गमे, माजी सर्वाधिकारी व अन्नदान विभाग प्रमुख, गुरुकुंज आश्रम, मोझरी, प्रा. रूपलाल कावळे, चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख, सुवर्णा पिंपळकर, कीर्तनकार, आशिष माणुसमारे, कीर्तनकार *ग्रामगीताचार्य ॲड. अतुल खापणे तसेच संतोष जीवतोडे, वरोरा तालुका प्रचारप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा यांच्या वतीने भोजराज कारेकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवाप्रवासाचे कौतुक करत त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भोजराज कारेकर यांनी WCL मधील आपल्या ३६ वर्षांच्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि मेहनतीला सदैव प्राधान्य दिले. त्यांच्या या प्रदीर्घ सेवाप्रवासामागे त्यांच्या पत्नी ग्रामगीताचार्य सुनीता भोजराज कारेकर यांची खंबीर साथ राहिली. यावेळी सुनीता कारेकर यांनी आपल्या मनोगतात पतीच्या संपूर्ण सेवाप्रवासातील संघर्ष, मेहनत, कुटुंबासाठी केलेला त्याग आणि सहजीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या भावपूर्ण मनोगताने उपस्थितांचे मन हेलावून गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन कन्या प्राची कारेकर यांनी केले. भजन, सामुदायिक प्रार्थना, आध्यात्मिक विचार, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सत्कार सोहळा यांच्या सुंदर संगमामुळे भोजराज कारेकर यांचा षष्ट्यब्दीपूर्ती व सेवानिवृत्ती सोहळा अत्यंत भावपूर्ण, मंगलमय व संस्मरणीय ठरला. उपस्थित आप्तेष्ट, मित्रपरिवार, सहकारी तसेच गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी कारेकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
