
चंद्रपूर, दि. ५ जून २०२६ : स्थानिक बेरोजगार युवक, कंत्राटी कामगार, प्रकल्पग्रस्त व विस्थापित यांच्या रोजगार व हक्कांच्या न्याय्य मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस पूर्ण झाला. आंदोलनकर्त्यांनी आज स्वतःच्या चेहऱ्यावर काळे फासून वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL), जिल्ह्यातील विविध उद्योग-समूह, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या भूमिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
रोशन हरबडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात स्थानिक बेरोजगारांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे, कंत्राटी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, श्रम कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, प्रकल्पग्रस्त व विस्थापितांना न्याय देणे तसेच स्थानिकांवर होत असलेला अन्याय थांबविणे या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत. चंद्रपूर, घुग्घुस, बल्लारपूर, मांजरी, गडचांदूर, राजुरा आदी भागांतील अनेक बेरोजगार युवक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रकल्प, खाणी, ऊर्जा निर्मिती केंद्रे आणि विविध कंपन्या कार्यरत असूनही स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवले जात आहे. अनेक कंपन्यांमध्ये इतर राज्यांतील नागरिकांना चंद्रपूर जिल्हातील बोलवून सर्व कंपनीत प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा, यासाठीच हे आंदोलन उभारण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
सरकारच्या धोरणांमुळे वाढत चाललेली महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमती, पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस, वीज, शिक्षण आणि आरोग्य सेवांवरील वाढलेला खर्च यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह बेरोजगार युवकांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. रोजगाराच्या संधी कमी होत असताना वाढत्या महागाईचा बोजा सहन करणे बेरोजगारांसाठी दिवसेंदिवस अवघड बनत आहे. अनेक सुशिक्षित युवकांना रोजगार मिळत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळावे आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलनाच्या विविध टप्प्यांमध्ये आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. दि. २ जून रोजी मुंडन आंदोलन करण्यात आले, तर दि. ३ जून रोजी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून निषेध करण्यात आला. आज चौथ्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी काळे फासून प्रशासनाच्या उदासीन आणि संवेदनाहीन भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला.
मागील चार दिवसांपासून आंदोलनकर्ते शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. मात्र, प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस आणि समाधानकारक कार्यवाही झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. वारंवार निवेदने देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
उपोषणकर्ते रोशन हरबडे व नंथू नवले यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, दि. ३ जूनपासून त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिल्याने त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची स्थिती गंभीर होत असून प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांसह संबंधित कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलवावे, रोजगार, श्रम कायदे, कंत्राटी भरती प्रक्रिया, नियमांची अंमलबजावणी आणि स्थानिकांना रोजगार देण्याबाबत चौकशी करावी तसेच स्थानिक बेरोजगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्यात येईल आणि पुढील काळात अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
