▪️हेल्मेटमुळे जीव वाचला; रस्त्यावर सूचना फलक व सुरक्षितता उपाययोजनांची मागणी..

वणी (प्रतिनिधी) : वणी मतदारसंघातील मोहर्ली गावाजवळ मुख्य मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात प्राध्यापक देविदास गायकवाड, रा. राम शेवाळकर परिसर, वणी, हे जखमी झाले असून त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांनी हेल्मेट घातलेले असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्राध्यापक देविदास गायकवाड हे राजीव कनिष्ठ महाविद्यालय, पाटण येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अपघातानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांना दिलेल्या मुलाखतीत रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक सुरक्षितता उपाययोजना, सूचना फलक तसेच संबंधित यंत्रणेच्या देखरेखीअभावी हा अपघात झाल्याचा आरोप केला.
रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालकांना पुढील रस्त्याची स्थिती, काम सुरू असल्याची माहिती आणि सुरक्षित मार्गदर्शन मिळावे यासाठी पुरेसे सूचना फलक, बॅरिकेड्स व सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. या ठिकाणी यापूर्वीही अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने अपघाताची पाहणी करून जखमी प्राध्यापकांच्या नुकसानीची दखल घ्यावी व नियमानुसार मदतीबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच, भविष्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे अपघात होऊ नयेत यासाठी सूचना फलक, बॅरिकेड्स, परावर्तक चिन्हे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे लक्ष द्यावे. रस्त्याच्या कामामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
