
वणी (प्रतिनिधी) : वणी विधानसभा क्षेत्रातील अरुणकुमार ऊर्फ बाळासाहेब खैरे, रा. वणी यांच्या वतीने पोळा व तान्हा पोळ्यानिमित्त समाजबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या शुभेच्छा फलकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मांडणीवरून समाजबांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सदर शुभेच्छा फलकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा खालच्या भागात, पायाजवळील जागेत असल्याचे दिसून येत असल्याने, या मांडणीवर आंबेडकरी समाजातील नागरिक व अनुयायांकडून आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा वापर करताना योग्य सन्मान व संवेदनशीलता राखणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या प्रकाराबाबत माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी नाराजी व्यक्त करून निषेध नोंदविला आहे. शुभेच्छा फलकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मांडणी अधिक सन्मानपूर्वक असणे अपेक्षित होते, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकारामुळे नाराज झालेल्या काही समाजबांधवांकडून वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्याची भूमिका घेतली जाणार असल्याची माहिती दि. ११ सप्टेंबर रोजी समोर आली आहे. सोशल मीडियावरही या शुभेच्छा फलकाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून, प्रतिमेच्या मांडणीमुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीची भूमिका तसेच वणी पोलीस प्रशासनाकडून याबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.
