
वणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साधेपणाने साजरा करून मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत करण्याचे आवाहन वणी शहर अध्यक्ष एड. निलेश माया महादेव चौधरी यांनी केलेल्या पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहर अध्यक्ष प्रा. महादेवराव खाडे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये ११,०००/- (अक्षरी रुपये अकरा हजार) इतकी आर्थिक मदत जमा केली.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीत गरजू नागरिकांना मदतीचा हात देणे, सामाजिक संवेदनशीलता जपणे आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अशा संकटकाळात समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेऊन मदतीसाठी योगदान देणे ही काळाची गरज आहे.
प्रा. महादेवराव खाडे यांनी दिलेल्या या योगदानामुळे एड. निलेश चौधरी यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाला बळ मिळाले असून, प्रा. महादेवराव खाडे यांच्या या सहकार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
