
यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करत असून, पावसाचे प्रमाण अनिश्चित असल्याने खरीप पिकांना सिंचनाची नितांत गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेंबळा कालव्यामध्ये तातडीने पाणी सोडून शेतकऱ्यांच्या पिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच बेंबळा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बेंबळा प्रकल्पाच्या कालव्यांद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र, सध्या कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, तूर तसेच इतर पिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून संबंधित गावांतील शेतकऱ्यांना तातडीने सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सध्या पावसाची कमतरता आणि जलसाठ्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे अलीकडील अहवालांतूनही समोर आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांमध्ये मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत कमी साठा असल्याचे वृत्त आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व १६ तालुके ‘ट्रिगर-१’ दुष्काळसदृश श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहेत.
बेंबळा प्रकल्पाचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव आणि मारेगाव या तालुक्यांतील मोठ्या क्षेत्राला होणार आहे. शासनाच्या माहितीनुसार या प्रकल्पामुळे सुमारे ५८,७६८ हेक्टर लागवडीलायक क्षेत्राला सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे.
“शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या मागणीवर तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल,” असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग, प्रदेशाध्यक्ष उद्योग आघाडी विजय निवल, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सोनाली मरागे, आणि जिल्हाध्यक्ष युवा आघाडी अक्षय महाजन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
