▪️८ जुन प्रकरण; जनरेटर बंद असल्याचा आरोप..

वणी (प्रतिनिधी): वणी शहरात दि. ८ जून रोजी सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास जोरदार वारा व पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास वारा-पाऊस सुरू होता. याच दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला. या वीज खंडितीचा सर्वाधिक फटका वणी ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण, गरोदर महिला आणि नवजात बालकांना बसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामीण भागातून उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण या रुग्णालयात येत असतात. मात्र ८ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून रात्री सुमारे ९.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिल्याने रुग्णालयातील आरोग्यसेवा प्रभावित झाली. विशेषतः नवजात बालकांच्या विभागात उष्णतेमुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. उकाडा आणि दमट वातावरणामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.
सध्या उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. वाढते तापमान, शहरातील वृक्षतोड आणि रात्री उशिरापर्यंत जाणवणारा उकाडा यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयातील जनरेटर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नवजात बालके, गरोदर महिला व इतर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला.

नवजात बालकांसाठी नियंत्रित तापमान आणि सातत्यपूर्ण वीजपुरवठा अत्यंत आवश्यक असतो. मात्र पाच तासांहून अधिक काळ वीज नसल्याने बालकांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली. या अगोदर नवजात बालक चोरी गेलेले प्रकरण झाले असून रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीसाठी सक्षम पर्यायी व्यवस्था ठेवणे अपेक्षित असताना ती नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेबाबत नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, जनरेटरची नियमित देखभाल न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
याशिवाय रुग्णालयात रुग्णांशी गैरवर्तन, औषधांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव, ट्रॉमा केअर सेंटरमधील मूलभूत सुविधांची कमतरता आदी समस्या दीर्घकाळापासून कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करून रुग्णांना दर्जेदार व सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

