
राळेगाव (प्रतिनिधी): केंद्र शासनाने यंदाही HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्याच्या लागवडीला परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत संघटनेच्या वतीने १७ जून रोजी राळेगाव तालुक्यातील खडकी येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्याची प्रतिकात्मक लागवड करण्यात आली.
शेतकरी संघटनेच्या मते, २००८ पासून तणनाशक-प्रतिरोधक तंत्रज्ञान असलेले HTBT कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत या तंत्रज्ञानाला अधिकृत मान्यता मिळालेली नसल्याने शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासून वंचित राहत असल्याचा दावा यावेळी आयोजित तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्यात करण्यात आला.
या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १० जून रोजी गुजरात सीमेवरील नंदुरबार येथे सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी गुजरातमधून प्रतिबंधित HTBT बियाणे महाराष्ट्रात आणून शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला होता. त्यानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्यात १७ जून रोजी दुपारी १२ वाजता खडकी येथील शेतकरी राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात शासनाची बंदी झुगारून HTBT कापूस बियाण्याची लागवड करण्यात आली. तसेच टाकळी परिसरात सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर या बियाण्याची लागवड करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला.
यावेळी आयोजित तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्यात वक्त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळणे हा त्यांचा घटनात्मक हक्क असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना कोणते बियाणे वापरायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे, शासनाने नवीन कृषी तंत्रज्ञानावर निर्बंध घालण्याऐवजी विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. देशाला आयात धोरणावरील अवलंबित्वातून मुक्त करून कृषी उत्पादनात आत्मनिर्भर व निर्यातक्षम बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप होते. यावेळी ललित बहाळे, अनिल घनवट, प्रज्ञाताई बापट, सीमाताई नरोडे, विजय निवल, मिलिंद दामले आणि दीपक आनंदवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी संघटनेचे संस्थापक स्वर्गीय शरद जोशी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
वक्त्यांनी आपल्या भाषणात सरकारे येतात आणि जातात, मात्र अन्नदाता शेतकरी कायम राहतो. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली तरच देशाचा खरा विकास होईल. मोठे नेते किंवा मोठे पक्ष नव्हे, तर सक्षम शेतकरी हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे, असे प्रतिपादन केले. देशातील वाढती बेरोजगारी आणि त्याचा शेतीवरील वाढता भार यावरही चिंता व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी शेतकरी संघटनेत नव्याने प्रवेश केलेल्या युवा शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गजानन पारखी, सतीश देशमुख, दीपक आनंदवार, चंद्रशेखर देशमुख, दशरथ पाटील, आशिष मुसळे, हिम्मतराव देशमुख, बबनराव चौधरी, अक्षय महाजन, गिरीष तुरके, मोहनराव चौधरी, गोपाल भोयर, किशोर झोटिंग, निलेश डवरे, दशरथ काळे, भास्कर पाटील, गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे यांच्यासह अकोला, बुलढाणा, नांदेड, वाशीम, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतील पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी बेंडे, भोयर मॅडम व इतर कर्मचारी तसेच पीएसआय सुखदेव अवधूत भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राजेंद्र झोटिंग यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमाची सांगता वज्रमूठ बांधून शेतकरी एकतेची शपथ घेत स्नेहभोजनाने करण्यात आली.
