
वणी (प्रतिनिधी): दि. २ जानेवारी २०२६ रोजी वणी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये नियमित पाणीपुरवठा करण्याबाबतची मागणी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली. सध्या या प्रभागात पाणीपुरवठा पाच दिवसांच्या अंतराने होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दामले नगर परिसरासह प्रभागातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रभागाचे नगरसेवक सोनाली प्रशांत निमकर व रितिक लक्ष्मण मामीडवार यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी नोंदवल्यानंतर ही मागणी पुढे नेण्यात आली.
दर दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच दामले नगर परिसरात लवकरच नवीन बोअरवेलचे काम सुरू करण्यात येणार असून त्यामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या मागणीवर नागरिकांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी पाणीपुरवठ्याची योग्य सोय करावी, अशी विनंती नगरसेवकांकडून मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
