
वणी (प्रतिनिधी) : वणी शहरात रात्रीच्या सुमारास काही तरुणांकडून दुचाकींवरून अतिवेगाने वाहन चालविण्याच्या घटना नागरिकांच्या निदर्शनास येत असून, त्यामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान टिळक चौक परिसरातून दोन दुचाकींवर काही तरुण व तरुणी जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी दुचाकींवर क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती बसल्याचे तसेच वाहने अतिवेगाने चालविल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे वाहन संबंधित दुचाकींच्या दिशेने सायरान वाजवत गेले असून, ग्रामीण रुग्णालय परिसरापर्यंत त्यांचा पाठलाग करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र संबंधित दुचाकीस्वार पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे समजते.
या प्रकारामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणारे पादचारी, वाहनचालक तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवेगाने वाहन चालविताना स्पीड ब्रेकर, वळण किंवा समोरून येणाऱ्या वाहनामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या निष्पाप नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यताही यामुळे निर्माण होते.
वणी शहरातील विविध चौक व प्रमुख मार्गांवर CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दि. ९ ऑगस्टच्या रात्रीची संबंधित CCTV चित्रफित तपासून दुचाकींची ओळख पटवावी, वाहन क्रमांकाची तपासणी करावी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेषतः अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवत असल्यास, दुचाकीवर क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती बसवून वाहन चालविले असल्यास किंवा अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविल्याचे आढळल्यास, संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेची CCTV फुटेज तपासून पोलिसांकडून नेमकी वस्तुस्थिती समोर आणली जाणार का? संबंधित दुचाकीस्वारांची ओळख पटवून वाहतूक नियमांनुसार कारवाई केली जाणार का? याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.
