
वणी (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून अधांतरी असलेल्या उकणी गावाच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी वेकोलिचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. हेमंत शरद पांडे यांनी सहकाऱ्यांसह उकणी गावाला भेट देऊन गावकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन अद्याप संपादन न झालेल्या शेतीची पाहणी केली.

उकणीवासीयांनी पुनर्वसन, योग्य मोबदला, उर्वरित जमीन संपादन, प्रदूषण, सुरुंग स्फोटांमुळे घरांना पडणारे तडे तसेच स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. कामगार नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नावर संघर्ष समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.
सीएमडी डॉ. पांडे यांनी उकणी गावात पोहोचून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उकणी कोळसा खाण व पुनर्वसन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने गावातील समस्यांचे निवेदन व प्रत्यक्ष परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. कोळसा खाणीत होणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे घरांना तडे जात असून परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गावाचे सुरक्षित व योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली.

घरांसाठी मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने त्याचे फेरमूल्यांकन करून बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. तसेच उकणी खंड-१ परिसरातील सुमारे १५ टक्के म्हणजेच १७० शेतकऱ्यांची जमीन अद्याप संपादित झालेली नाही. या प्रलंबित जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, अशी मागणी संघर्ष समिती व उकणीवासीयांनी केली.
सीएमडी डॉ. हेमंत पांडे यांनी प्रलंबित प्रश्नांची माहिती घेतल्यानंतर संबंधित वेकोलि अधिकाऱ्यांना आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन, मोबदला आणि जमीन संपादनाच्या प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

“प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची अपेक्षा” – संजय खाडे
“सीएमडी साहेबांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि गावकऱ्यांच्या वेदना ऐकून घेतल्या, ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. संघर्ष समिती आणि उकणीवासीयांच्या वतीने त्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल मनःपूर्वक आभार. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती मिळेल आणि लवकरच आमच्या मागण्या मार्गी लागतील, अशी आम्हाला आशा आहे,” अशी प्रतिक्रिया कामगार नेते संजय खाडे यांनी व्यक्त केली.
यावेळी कामगार नेते व एचएमएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवकुमार यादव, संजय खाडे, अर्जून खापणे, विवेक धांडे, कुणाल बोंजे, सागर डांगे, कवडू पचारे, सुहास डाहुले, त्रिकाल ढापकस, अशोक गोवारदिपे, अक्षय ढापकस यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य, उकणीवासी तसेच वेकोलिचे अधिकारी उपस्थित होते.
