▪️ मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम असलेल्या सदनिकांच्या नोंदणीबाबत कडक निर्देश; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुय्यम निबंधकांचीही चौकशी होणार..
वणी (प्रतिनिधी) : कष्टाच्या पैशातून घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी राज्य शासनाने अनधिकृत बांधकामांशी संबंधित दस्तनोंदणीवर निर्बंध घालण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून महसूल विभागाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन परिपत्रक जारी केले आहे.
या निर्णयामुळे वणी शहरातील फ्लॅट खरेदीदारांसाठीही हा विषय महत्त्वाचा ठरणार आहे. शहरात सदनिका खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना संबंधित बांधकामाची परवानगी, मंजूर नकाशा आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे.
शासनाच्या निर्देशांनुसार, नियमबाह्य बांधकामांशी संबंधित सदनिकांच्या प्रथम विक्रीचे करार, खरेदीखत, डीड ऑफ अपार्टमेंट आणि हस्तांतरणपत्रांच्या नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. मंजूर बांधकाम नकाशातील क्षेत्रफळापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या सदनिकांच्या दस्तनोंदणीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
महारेरा नोंदणी आवश्यक असलेल्या प्रकल्पांसाठी संबंधित प्रमाणपत्रे आणि सदनिकेचे क्षेत्रफळ नमूद असलेला मंजूर बांधकाम नकाशा, तर महारेरा नोंदणी आवश्यक नसलेल्या प्रकल्पांसाठी सक्षम प्राधिकरणाची बांधकाम परवानगी किंवा प्रारंभ प्रमाणपत्र, मंजूर नकाशा, झोन दाखला आणि मोजणी नकाशा यांसारखी आवश्यक कागदपत्रे तपासली जाणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास दस्तनोंदणी नाकारण्याची कार्यवाही केली जाऊ शकते. तसेच, शासनाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या संबंधित दुय्यम निबंधकांविरुद्ध विभागीय चौकशीची तरतूद करण्यात आली आहे.
वणीतील नागरिकांनी फ्लॅट खरेदी करताना बांधकामाची अधिकृत परवानगी, मंजूर नकाशा आणि लागू असलेली आवश्यक प्रमाणपत्रे तपासूनच व्यवहार करावा, असे आवाहन या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते.
न्यू वणी डायरी न्यूज पोर्टल
सामान्य जनतेचा आवाज — जनतेसाठी!
