
वणी (प्रतिनिधी) : वणी उपविभागीय क्षेत्रातील शिंदोला ते साखरा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
“रस्ता लगेच बनवू नका; मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी करा. यावेळी स्थानिक नागरिकांच्या हस्ते आपले अभिनंदन करू,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
यापूर्वी दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी संबंधित रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन देण्यात आले होते. रस्त्याच्या कामासाठी वर्क ऑर्डर मिळूनही अनेक दिवस कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या प्रश्नाची दखल विविध वृत्तपत्रांनीही घेतली होती.
मात्र, वर्षभराच्या कालावधीतच रस्त्याची पुन्हा अशी दुरवस्था होत असेल, तर या निकृष्ट कामासाठी जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दूरध्वनीवरील चर्चेदरम्यान येत्या १० दिवसांत रस्त्याच्या कामाची दखल घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. अन्यथा जनहितार्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

