वणी : १४ एप्रिल रोजी वणी शहरातील दामले नगर वार्डातून सायंकाळी ६ वा. काढण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीदरम्यान, अज्ञात व्यक्तीने तेली फैल येथील एन.के. बारसमोर काचाची दारूची बाटली फेकली. ही बाटली रॅलीतील एका भारतीय सैन्यात कार्यरत जवानाच्या पत्नीला लागून डोक्याला दुखापत झाली.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता, सैन्याच्या पत्नीने व त्याच्यासोबत समाजबांधवांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस फक्त वरवर चौकशी करून प्रकरण दाबल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत.
घटनेला आता काही दिवस उलटले असतानाही संबंधित आरोपी अद्याप मोकाट आहे. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी ठाम मागणी समाजबांधवांकडून केली जात आहे.
“जाणीवपूर्वक शांततापूर्ण रॅलीत अशा प्रकारचा हल्ला करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला असून, याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी,” असे आवाहनही करण्यात आले आहे.
