Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी–घुग्घुस रोडवरील लालगुडाजवळ भीषण अपघात; एका कुटुंबातील चार निष्पाप जीवांचा मृत्यू
  • वणी

वणी–घुग्घुस रोडवरील लालगुडाजवळ भीषण अपघात; एका कुटुंबातील चार निष्पाप जीवांचा मृत्यू

NewWaniDiary 31/10/2025

▪️बायपासवरील ट्रक वाहणाचे अतिवेग; अपघाताच्या घटनांनी वणी हादरली, सुरक्षिततेच्या मागण्या तीव्र..

वणी (प्रतिनिधी) – घुग्घुस रोडवरील लालगुडा–बामणी पाट्याच्या महामार्गावर आज (३१ ऑक्टोबर) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील चार निरागस जीवांचा बळी गेला ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. कारला ट्रकने दिलेल्या जबर धडकेत तीन कोवळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी रियाज शेख (५५, रा. भीमनगर, वणी) यांचाही दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या भावाची चार वर्षांची मुलगी अजूनही गंभीर असून तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

लाल पुलिया परिसरातील रियाज शेख हे सुट्टीच्या दिवशी आपल्या मुलीला कार चालवायला शिकवत होते. त्यांनी स्कोडा (O1AH 5700) कारमध्ये मुली लियाबा, मायरा, अमिरा आणि भावाची लहान मुलगी यांना घेऊन सकाळी बाहेर पडले होते. परंतु नियतीच्या क्रूर घाल्याने चारही जीव काळाच्या पडद्याआड गेले.

प्रभाग क्र. ५ भीमनगर तसेच संपूर्ण वणी शहरावर शोककळा पसरली आहे. “काळाने एका बापाची तीन लेकरं हिरावून घेतली आणि शेवटी त्यालाही गाठलं…” अशी हळहळ नागरिकांमध्ये उमटत आहे. प्रेमळ पिता आणि तिन्ही निरागस मुली — असे चारही दिवे क्षणार्धात विझून गेले.

हा अपघात केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक वेदनादायी आणि अंतःकरण हेलावून टाकणारा क्षण ठरला आहे. आज वणीने चार अनमोल जीव कायमचे गमावले.

याआधीही ५ मे रोजी ब्राह्मणी फाटा परिसरात दुचाकी–ट्रकच्या भीषण अपघातात शेतकरी नेते देवराव धांडे यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. या वणी बायपास मार्गावर वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

या मार्गावरून कोळशाने भरलेले ओव्हरलोड हायवा ट्रक अतिवेगाने व बेदरकारपणे धावत असल्याने अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वणी शहरात अनेक परराज्यातील ट्रान्सपोर्ट कंपन्या कार्यरत असून काही परिसरातील विविध रस्त्यांवर मोठमोठे खडे पडले आहेत, जे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

त्यामुळे संबंधित प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस वणी शाखेने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. चौकांवर नियमित ट्रॅफिक नियंत्रण ठेवणे, ओव्हरलोड ट्रकवर कारवाई करणे तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये सिमेंट-कॉंक्रिट, मुरूम, गिट्टी टाकून दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Continue Reading

Previous: महाविकास आघाडीत भीम आर्मीचा समावेश; वणी नगरपरिषद निवडणुकीत नव्या घडामोडींना वेग
Next: ट्रकच्या धडकेत कुटुंब उद्ध्वस्त;आज चार वर्षीय बालिकेचा मृत्यू

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.