▪️ वणी नगरपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत शिवसेनेला वेग…

वणी (प्रतिनिधी): वणी नगरपरिषद निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांकडून सभा, पदयात्रा आणि घरदार संपर्क मोहिमा जोमात सुरू असून प्रचंड थंडीमध्येही प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, आज दि. ३० नोव्हेंबर रोजी शिवसेना (शिंदे गट) तर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार कु. पायल यशवंत तोडसाम तसेच सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली.

रॅलीची सुरुवात सकाळी १० वाजता शासकीय मैदान (पाण्याच्या टाकीजवळ) येथून करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर रॅलीचा मार्ग पुढील प्रमुख चौकांतून पुढे सरकला—
खाती चौक – महात्मा गांधी चौक – संत गाडगे महाराज चौक – शहीद भगतसिंग चौक – स्वातंत्र्यवीर सावरकर चौक – नेताजी सुभाषचंद्र बोस चौक – टैगोर चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, येथे बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या विशाल मिरवणुकीत हजारो महिला, पुरुष आणि युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रॅलीदरम्यान विविध चौकांत शिवसेना नेते विजय चोरडिया यांचे हार घालून आणि घोषणाबाजी करत स्वागत करण्यात आले. वणीच्या मार्केट लाइन परिसरातील नागरिकांनी घरांवरून फुलांचा वर्षाव करून उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. केवळ सव्वा महिन्यात पक्षाची वाढलेली ताकद या रॅलीत स्पष्टपणे दिसून आल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले.

नगराध्यक्ष पदासह २९ नगरसेवक पदांचे उमेदवार रॅलीत उपस्थित होते. तसेच विनोद मोहितकर, मनिष सुरावार, कुणाल चोरडिया, बंटी ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेवटी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीची सांगता करण्यात आले.
राजकीय जाणकारांच्या मते, ही रॅली विरोधकांसाठी निश्चितच एक मोठे आव्हान निर्माण करणारी ठरली आहे.
