▪️ अपक्ष उमेदवारांचे प्रश्न गंभीर: ‘चार दिवसात प्रचार कसा करणार?’..

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद २०२५ निवडणुकीत विविध पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून २० नोव्हेंबरपासून पक्षीय उमेदवार मतदारांशी भेटीगाठी घेताना दिसत आहेत. पक्षांचे अधिकृत निवडणूक चिन्ह उपलब्ध असल्याने त्यांच्या प्रचारात कोणतीही अडचण जाणवत नाही.
दरम्यान, काही पक्षांकडून सामाजिक कार्यकर्ते आणि जबाबदार व्यक्तींची उमेदवारी कापण्यात आली असून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही अन्य जबाबदार व्यक्तींनी पक्षाचे उमेदवारीला नाकारुन थेट अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरून सामना देण्याचे ठरवले आहे.
मात्र, अपक्ष उमेदवारांना प्रचारात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण, २६ नोव्हेंबर रोजी च अपक्ष उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हाचे वाटप होणार असून, त्यानंतरच त्यांना अधिकृतरित्या प्रचार सुरू करता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चिन्ह वाटप झाल्यानंतर अपक्षांच्या हाती प्रत्यक्ष प्रभावी प्रचारासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी उपलब्ध राहणार आहे. इतक्या कमी वेळेत अध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी मतदारांपर्यंत पोहोचणे कसे शक्य होणार, असा प्रश्न उमेदवार आणि मतदारांमध्ये उपस्थित होत आहे.
दरम्यान, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या या अत्यल्प वेळेबाबत स्थानिक पातळीवर तसेच संबंधित विभागाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
