
वणी (प्रतिनिधी) : मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण जश्ने ईद मिलाद-उन-नबी बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी वणी शहरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लिम समाजबांधवांकडून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ईद मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने वणी शहरातील मदिना मस्जिद ते टिळक चौक, खाती चौक व मोमिनपुरा परिसरात आकर्षक व भव्य रोषणाई करण्यात आली आहे. विविध रंगांच्या विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला असून, शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच मुख्य चौकांसह काही ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात नागरिकांची वर्दळ वाढली असून, ईद मिलाद-उन-नबी उत्साहात साजरा करण्यासाठी मुस्लिम समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

